पिंपरी-चिंचवड- महादेव जानकर यांनी पिपंरी चिंचवड येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित आठवणीतले मुंडे साहेब या कार्यक्रमात मुंडे भगिनींचे कौतुक करताना म्हटले की बीड आणि परळीत प्रीतम आणि पंकजा मुंडे यांना कोणाचा बापही हरवू शकत नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियो मधून त्यांचा दुटप्पीपणा नेटकरी लक्षात आणून देतात.
पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले जानकर
राज्यमंत्री महादेव जानकर म्हणाले की, जो कोणी म्हणतोय की, मीच निवडून येणार त्याला चॅलेंज देऊन सांगतो की बीड आणि परळी मधून प्रीतम आणि पंकजा मुंडे मोठ्या फरकाने निवडून येतील. कोणाचा बापही त्यांना हरवू शकत नाही. त्यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता केलेली ही टीका होती.
मला कुठला स्वार्थ नाही. भगवे कपडे घातले तर महाराज बनेल. मुंडे यांच्यामुळे राजकीय क्षेत्रातील उंची वाढली. सर्वकाही रेडीमेड मिळाले असं देखील ते म्हणाले. बारामती निवडणूक हरलो आणि नॅशनल हिरो झालो, ताई तुमचा आशीर्वाद राहू द्या पुन्हा कुस्ती खेळायची आहे. असं म्हणत बारामतीमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान त्यांनी राजेश टोपे यांच्या मतदार संघात एका कार्यक्रमामध्ये टोपे यांच्यावर टीका करताना गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल जे उद्गार काढले होते त्यांची आठवण जानकरांना नेटकरी करून देतात.
नेमकं काय म्हणाले होते जानकर त्या व्हिडियोत
मी काय करतो नरडीचा घोटाला हात घालतो. मी राजेश टोपे फोजेश टोपेला व्हॅल्यू देत नाही, मोहिते बिहितेला व्हॅल्यू देत नाही. मी काय करतो बाळ ठाकरेच्या नरडीचा आणि शरद पवारच्या नरडीचा घोट घेण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या समोर मुंडे सुद्धा फार मोठा नाही, मुंढे फार शुल्क माणूस आहे, प्रमोद महाजन होते तोवर मुंढे होता आता किस झाड कि पत्ती, मुंडे बिंडे सुंडे फुंडे कोण असते काय नसते, असे बोलतांना महादेव जानकर दिसत आहेत.
जानकर यांच्या याच वक्तव्याची आठवण नेटकऱ्यांनी त्यांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मुंडे साहेबांमुळे तुम्ही मोठे झालात त्यांच्या बाबतीत तरी तुम्ही असे कसे बोलू शकता असा सवाल नेटकऱ्यांनी जानकर यांना केला आहे.
















